LOADING

Type to search

सुगंध नात्यातला!!

299 Views
Share
अजिंक्य आणि त्याची आजी घराच्या बाजूच्या गार्डन मधे खेळायला निघाले. नातवाचा बॉल, पाण्याची बाटली आणि घाम पुसायला रुमाल, आजीचे गाणी ऐकायला हेडफोन आणि रात्रीच्या जेवणाला मेथीची पराठे करायचा बेत असल्याने ती देखील घेतली निवडायला. आजी आणि अजिंक्य रोज सायंकाळी जायचे गार्डन मधे. अजिंक्य झोका, घसरगुंडी, क्रिकेट, फुटबॉल जे जमेल ते खेळायचा. कधी मोठ्या मुलांमधे, कधी अगदी ४ वर्षांखालील मुलांसोबत. ह्या वर्षी तो ८ वर्षांचा होणार होता, आजी कायम सांगायची, “सोनू, जे जमेल ते खेळ, सगळ्यांमधे  मिसळून खेळ. हरलास तर शिकशील आणि जिंकला तर मज्जाच.” अजिंक्य नेहमी आजी च ऐकायचा.अजिंक्यचे मम्मी पप्पा दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे, आजोबा खूप पूर्वीच हृदयविकाराने देवाघरी गेले. आजी आणि अजिंक्य मस्त राहायचे. अजिंक्यला सकाळी शाळेत त्याचे मम्मी पप्पा सोडवायचे आणि दुपारी स्कूल बसने तो घरी यायचा. मग दुपारच जेवण दोघे एकत्र करायचे, थोडा वेळ निवांत झोपायचे, ४ वाजता आजीबाई चहा घेत आणि नातवाला दुध आणि सुखा मेवा देत. रात्रीच्या जेवणाची थोडी तयारी करुन दोघे गार्डन मधे जायचे. ७ वाजता अजिंक्यचे मम्मी पप्पा येत, त्याची मम्मी मग स्वयंपाक आवरायची, अजिंक्य अभ्यास करायचा, आजी आणि त्याचे पप्पा टीव्ही बघायचे.

आज आजी गार्डनच्या बाकड्यावर बसून मेथी साफ करत होती, सुनबाईचा वाढदिवस आहे आज, तिला सासूबाईच्या हातचे मेथीचे पराठे खूप आवडतात. “आत्या एकदम जगात भारी आहेत तुमचे पराठे,” अशी बोलली होती ती पहिल्यांदा पराठे खाल्ल्यावर.
तासाभरात मेथी साफ करुन झाली आजीबाईची आणि अरिजीत सिंगची ‘ लेटेस्ट हिट्स’ सुद्धा ऐकुन झाली. अजिंक्यची वाट बघत होती आजी, पण तो गार्डन मधे दिसत नव्हता. अजिंक्य असा कधी आजीला न सांगता गेला नव्ह्ता. आजीला घाम फुटला, कुठे गेला असेल, नको ते विचार यायला लागले. आजीने त्याच्या मित्रांना विचारले तर समजले की तो केव्हाच कुठेतरी गेला. ७ वर्षांचा मुलगा कुठे गेला.. त्याला काही झाल तर? शेवटी नाइलाजाने आजीने तिच्या मुलाला फोन केला, हॅलो न बोलताच आजी रडू लागल्या, “माझा सोनू मला सापडत नाहीये. गार्डन मधून पळून गेला.. तुम्ही दोघे लगेच घरी या.” आजी घरी आली, देवघरात जाऊन खूप रडली, तिच्या लाड्क्या कृष्णाला पाण्यात ठेवले, “माझा सोनू मला नाही सापडला तर मग गाठ माझ्याशी आहे तुझी देवा.” सुनबाई आणि आजीचा मुलगा घरात आले. अजिंक्यची मम्मी सासूबाईला आणि स्वतःला सावरत होती, त्याचे पप्पा फोनवर जरा चौकशी करत होते, “तु आणि आई घरीच थांबा मी आलोच.. बघून येतो खाली” अस बोलत पप्पा चप्पल घालतात तर अजिंक्य समोर उभा होता. “अजिंक्य बाळा.. कुठे गेला होतास? आम्ही किती घाबरलो. किती मूर्खपणा!” पप्पानी त्याला जवळ केल. “सोनू तु आलास.. कुठे गेला होतास मला न सांगता?” आजीने त्याला जोरात मिठी मारली. “अजिंक्य अरे काय हे बाळा. तुला सांगितले आहे ना अस न सांगता कुठे जायच नाही, तुला काही झाल असत तर?”

“अग मम्मी किती डर्पोक आहात तुम्ही सगळे. मी आपल्या टेरेस वर होतो,” अजिंक्य हसत बोलला. “पण तु टेरेसवर काय करत होतास?” आजीने विचारले. “मम्मी साठी गिफ्ट बनवत होतो, तु तिला मेथीचे पराठे खाऊ घालणार, पप्पा नी पण तिला सुंदर ड्रेस दिला सकाळी मग मिच राहिलो ना, माझ्याकडे पैसे पण नव्ह्ते,” अजिंक्य बोलत होता. “अरे मग माझ्याकडून घ्यायचे ना पैसे,” आजी रागाच्या स्वरात बोलली. “तुझ्याकडून घेतेले असते तर माझ सर्प्राईज फेल झाल असत. म्हणून मी गार्डन मधून लवकर आलो आणि माझ गिफ्ट बनवल,” अजिंक्य पुन्हा हसून बोलला.” दोन्ही हाताची मुठी मम्मी समोर ठेवून बोलला, “मम्मी ओळख माझ गिफ्ट?” मम्मीने डोळे मिटून घेतले आणि अजिंक्यचा हात हातात घेउन बोलली, “तु माझ्यासाठी मोगरयाचा गजरा बनवलास!”  तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. “तुला न बघता कस समजल मम्मी?” अजिंक्य जरा चिडून बोलला. “मोगरयाचा सुगंध कधी लपत नाही, कितीही बंद करून ठेवले तरीही नाही. अगदी तुझ्यासारखा, आम्ही तुला किती कमी वेळ देतो तरीही तु आमच्यावर किती प्रेम करतोस,” मम्मी  तिच्या बाळाचा मुका घेत बोलली.” मला आजीच बोलते नेहेमी, “सोनू तुझ्यासोबत कोणी कसही वागल तरी तु प्रेमाने वाग. शेवटी तूच जिंकशील. आणि मम्मी तुला वेळ नाही म्हणून काय झाल, तु आणि पप्पा किती काम करता सगळे सांगत असते आजी मला. बघना तुझा आज बर्थडे तरी तु किती बिझी आहेस.” मम्मीच्या काळजावर खूप घाव झाले, तिच्या लेकराला तिने छातीशी घट्ट धरले, सासूबाईंना पण जवळ केले, “तुम्ही सर्व माझ्यासोबत असेच रहा. हेच माझे गिफ्ट आहे,” मम्मीचे आनंदाश्रू काही थांबत नव्ह्ते. ” आजी लवकर  पराठे बनव, भूक लागली आहे मला,” बोलत अजिंक्य हातपाय धुवायला गेला. सासूबाईने सुनबाईच्या केसात स्पेशल मोगराचा गजरा माळला.

Photo Courtsey: cinestaan.com

8 Comments

  1. Unknown February 13, 2020

    Ekdam mast.

    Reply
  2. SHALAKA February 13, 2020

    Khup chan,

    Reply
  3. Diary of a housewife February 13, 2020

    Thank you

    Reply
  4. Diary of a housewife February 13, 2020

    Thank you

    Reply
  5. Unknown February 14, 2020

    बालभावनांची सुंदर गुंफण असलेली कथा👌

    Reply
  6. Unknown February 16, 2020

    गंमतीशीर

    Reply
  7. Diary of a housewife February 17, 2020

    धन्यवाद

    Reply
  8. Diary of a housewife February 17, 2020

    धन्यवाद

    Reply

Leave a Comment SHALAKA Cancel Comment